Home Blog

🚨 पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

🚨 पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

संपादकीय :-

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

📍 पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

– लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

– टोल फ्री हेल्पलाईन : १०७७

– मोबाईल : ९३७०९ ६००६१

🏛 पुणे महानगरपालिका (PMC)

– ०२०-२५५०१२५९

– ०२०-२५५०६८००

🏙 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

– ०२०-६७३३११११

🚑 पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)

– ९५४५२ ८२९३०

⚠️ नागरिकांना आवाहन :

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

पुणे, दि. ५ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दि. ६ जुलै रोजी सुट्टी राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

 

सरडेवाडी, ता. इंदापूर : चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर येथील डॉ. राहुल जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टरांचा समाजातील अनमोल वाटा, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृती याविषयी सविस्तर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सेवाभाव, संवेदनशीलता आणि व्यावसायिक प्रामाणिकता जपावी, असे आवाहन केले.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजारपण, अपघात, महामारी किंवा कोणत्याही आरोग्यविषयक संकटाच्या काळात डॉक्टर आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करतात. त्यामुळे समाजात डॉक्टरांचे स्थान अत्यंत मानाचे आणि आदरणीय आहे.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा केवळ डॉक्टरांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून समाज आणि आरोग्यसेवा यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर आदर अधिक दृढ करणारा दिवस आहे. डॉक्टरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नागरिकांनीही आरोग्याविषयी सजग राहून वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैराश्य (डिप्रेशन), चिंता (अॅन्झायटी), ताण-तणाव आणि इतर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून, या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानसिक आजारांविषयी समाजात असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. नैराश्य किंवा चिंतेची लक्षणे दिसल्यास ती लपविण्याऐवजी कुटुंबीय, मित्र किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ध्यान-योग आणि सकारात्मक विचारसरणी यांमुळे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपैकी सुप्रिया पांढरे, राजनंदिनी खबाले, आरती कारंडे आणि संग्राम गायकवाड यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त मनोगते व्यक्त केली. त्यांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आरोग्य जनजागृती, निरोगी जीवनशैली आणि फार्मासिस्टची भूमिका याविषयी प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. गीतांजली कांबळे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे महत्त्व विशद करताना आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.प्रा. स्वप्नील पाटील यांनी विद्यार्थ्यांना रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा, नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यसेवेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले तसेच कोषाध्यक्ष श्री. सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये घवघवीत यश

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये घवघवीत यश

संपादकीय :-

सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील प्रथम वर्ष डी.फार्मसी व द्वितीय वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल नोंदवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. महाविद्यालय हे फार्मसी कौन्सिलिंग ऑफ इंडिया, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्न असून गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणासाठी ओळखले जाते.
यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कु. साक्षी तुकाराम राखुंडे यांनी 76.30% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. पिंकू राजू शिंदे यांनी 74.10% गुणांसह द्वितीय क्रमांक, कु. विद्या तुकाराम गुरगुडे यांनी 72.40% गुणांसह तृतीय क्रमांक, कु. पायल लाहू बनसोडे यांनी 70.10% गुणांसह चतुर्थ क्रमांक तर कु.सायली योगेश घाडगे यांनी 69.40% गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
तसेच महाविद्यालयातील एस.वाय. डी.फार्म. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कु. विद्या भोई आणि कु. प्रतिक्षा गुंड यांनी प्रत्येकी 77.09% गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. कु. शिल्पा भोपे हिने 75.55% गुणांसह द्वितीय, कु. वैष्णवी खटाळ हिने 75.46% गुणांसह तृतीय, तर कु. वर्षराणी इरकर हिने 73.82% गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच शिवम ननवरे यांनी 71.73% गुण मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले

प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, अधिक मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम फार्मासिस्ट बनण्याचे आवाहन केले. महाविद्यालय उत्कृष्ट शिक्षण, नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, प्रयोगशाळा सुविधा आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल.”
यावेळी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची चिकाटी, नियमितता आणि जिद्द हे महत्त्वाचे घटक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी हे “Revolution Through Education” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देत असून शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेचा गौरव अधिकच वाढला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची कठोर मेहनत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डी.फार्मसी व बी.फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संपादकीय

सरडेवाडी येथील चेतना इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने सर तसेच शाळेच्या प्राचार्या निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास नर्सरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ गणेश म्हस्के सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर वढणे साहेब, प्रवीण भैय्या माने, प्रदीप दादा गारटकर, ॲड. मयूर शिंदे, प्रेमकुमार जगताप, रामभाऊ आसबे, सचिन शिरसट, आप्पासाहेब माने आणि नवनाथ शिंदे सर उपस्थित होते. तसेच पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक आजिनाथ दळवी सर, बाळासाहेब शिंदे सर आणि हनुमंत यादव सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी प्रवीण भैय्या माने यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना, “जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तीच असते ज्याचे शरीर निरोगी असते,” असे सांगून नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच चंद्रशेखर वढणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश दिला. नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी राहते व मन शांत व एकाग्र होते, असे त्यांनी सांगितले.

योग दिनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन भोजू गायकवाड सर व ज्योती शिंदे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राखण्याची जबाबदारी माधुरी चव्हाण मॅडम व मोरे मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे सर यांनी केले, तर जयश्री सचिन गोळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला व विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोलाची मदत झाली,चेतना स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये योग दिन यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये चिन्मय देशपांडे सर, प्रवीण सुर्वे सर यांचे खूप मोलाचे योगदान केले.

या मध्ये देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पने तुन एक पेढ माँ के नाम हा पण उपक्रम हिंदुस्थान 24न्यूज टीम व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांनी रबावाला

पुणे–राजस्थान रेल्वे सेवांच्या विस्तारासाठी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर निवेदन

पुणे–राजस्थान रेल्वे सेवांच्या विस्तारासाठी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर निवेदन

 

पुणे, महाराष्ट्र : जन आंदोलन ग्रुप (पुणे) यांच्या वतीने पुणे व राजस्थान दरम्यान अधिक सक्षम व सोयीस्कर रेल्वे संपर्क उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. अश्विनी वैष्णव यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती पुणे, जोधपूर, जालोर-सिरोही, पाली तसेच बाडमेर-जैसलमेर येथील माननीय खासदार आणि रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

जन आंदोलन ग्रुपचे संयोजक डी. आर. कुमावत यांनी सांगितले की, पुणे व परिसरात राजस्थानमधून स्थलांतरित झालेले लाखो नागरिक वास्तव्यास असून रोजगार, व्यवसाय, शिक्षण, धार्मिक यात्रा तसेच कौटुंबिक कारणांसाठी त्यांचा राजस्थानकडे सतत प्रवास सुरू असतो. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित रेल्वे सेवांमुळे प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत असून तिकीट उपलब्धतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

 

निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

 

• बाबा रामदेवरा यात्रेदरम्यान पुणे–रामदेवरा/जैसलमेर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी.

• श्रावण व भाद्रपद महिन्यांत अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन करण्यात यावे.

• पुणे–भिलडी–जालोर–जोधपूर या मार्गावर नवीन थेट नियमित रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी.

• आठवड्यातून २ ते ३ फेऱ्या अथवा दैनंदिन रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.

• पुणे–फालना–मारवाड जंक्शन–जोधपूर–रामदेवरा–जैसलमेर मार्गावर अमृत भारत अथवा वंदे भारत स्लीपरसारख्या आधुनिक रेल्वे सेवांच्या संचालनाचा विचार करण्यात यावा.

 

कुमावत यांनी नमूद केले की, ही मागणी केवळ राजस्थानमधील नागरिकांपुरती मर्यादित नसून लाखो भाविक, विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक तसेच स्थलांतरित कामगार यांच्या हिताशी निगडित आहे. जनभावना लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने या विषयावर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

 

जन आंदोलन ग्रुपने आशा व्यक्त केली आहे की, वाढती प्रवासी संख्या व जनतेची मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय पुणे–राजस्थान मार्गावर नवीन नियमित तसेच विशेष रेल्वे सेवांना लवकरात लवकर मंजुरी देईल.

 

जारीकर्ता :

 

डी. आर. कुमावत

संयोजक, जन आंदोलन ग्रुप (पुणे)

ई-मेल : janandolangrouppune@gmail.com

पुणे, महाराष्ट्र

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

संपदाकीय :-

पुणे, दि. १८ : पुणे शहरासाठी महत्त्वाच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात उपलब्ध ४.१३ टीएमसी आणि पवना धरणातील १.६५ टीएमसी पाणीसाठ्याचे अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन करावे, कोणत्याही परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

पर्जन्यमान विश्लेषण, धरणातील पाणीसाठ्याचा आणि पाणीवापराचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, उपजिल्हाधिकारी चारुशीला मोहिते, कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, किरण देशमुख यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहाची जिवंत साठा क्षमता २९.१५ टीएमसी असून ४.१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पवना धरणामध्ये १.६५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्राच्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या अंदाजित अनुक्रमे ४ व १.५ टीएमसी पिण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार योग्य नियोजन करावे, असे ते म्हणाले.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व अन्य पाणी वापर वापरकर्त्यां संस्थांनी उपलब्ध साठा व आगामी गरजा लक्षात घेऊन पाणी वापराचे पुनर्नियोजन करावे. धरणे, कालवे, नद्या व इतर जलस्रोतांमधील अनधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवावी. सर्व संबंधित विभागांनी जलसाठा, पर्जन्यमान, आवक व पाणी वापराचा साप्ताहिक आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, असे श्री. डुडी यांनी सांगितले.

ते म्हणाले, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जलसंपदा विभागाने जलाशय प्रचलन- संवर्धन (कंझर्वेशन रिझर्व्हायर ऑपरेशन) धोरण अवलंबून जलाशय संचालन करावे व आवश्यकतेनुसार पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. येत्या कालावधीमध्ये धरणामध्ये पावसाचा येवा आल्यानंतर विसर्ग सुरू करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनास अवगत करण्यात यावे.

शासनाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला साठा संरक्षित ठेवणे, बेकायदेशीर पाणी उपसा रोखणे व नियमित आढावा घेणे, पुणे जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आणि राखीव साठा सुरक्षित ठेवणे याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.

अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर साधनांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याबाबत महसूल यंत्रणेला सूचना बैठकीत देण्यात आल्या.

पुणे विभागात आजचा उपयुक्त जलसाठा ७७ टीएमसी (१४.३०टक्के) असून गतवर्षीच्या १६९.९ टीएमसी (३१.१६ टक्के) च्या तुलनेत सुमारे ९०.९ टीएमसी इतकी तूट आहे, असल्याचे श्री. कोल्हे यांनी सांगितले.

प्रारंभी श्री. कोल्हे यांनी भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या एल-निनोच्या संभाव्य प्रभावाचा, पुणे विभागातील जलसाठ्याची सद्यस्थिती, गतवर्षीच्या तुलनेतील लक्षणीय तूट, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा स्थिती, पर्जन्यमान विश्लेषण, संभाव्य धोके व आवश्यक उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

विकसित भारत जी राम जी’ अधिनियमाला जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

विकसित भारत जी राम जी’ अधिनियमाला जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

संपादकीय:-

पुणे, दि. १८: ‘विकसित भारत जी राम जी’ अधिनियमाच्या तरतुदी, लाभ, कायदेशीर बळकटी, ग्रामस्थांचे अधिकार व कर्तव्ये आदींच्या अनुषंगाने प्रचार व प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत असून 22 जूनपासून ग्रामस्तर ते तालुका व जिल्हा स्तरापर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन अधिनियमाची सविस्तर माहिती व उपलब्ध लाभांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्वयं- सहाय्यता गट, युवक मंडळे, आशा सेविका, महिला बचत गट, शेतकरी, मनरेगा कामगार व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याची ही संधी आहे.

श्री. डुडी म्हणाले, ग्रामीण विकास व ग्रामस्वराज्याच्या बळकटीकरणासाठी भारत सरकारने सद्यस्थितीत अस्तीत्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ऐवजी विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ लागू केला आहे. या अधिनियमाचा उद्देश ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची वैधानिक हमी प्रदान करणे, शाश्वत ग्रामीण मालमत्ता निर्माण करणे, स्थानिक विकासाला चालना देणे तसेच विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे. ग्रामपंचायतींना विकास नियोजनामध्ये अधिक सक्षम भूमिका प्रदान करण्यात आली आहे. विकसित भारत -रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ बाबत जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये (डिसेंबर २०२५ मध्ये) विशेष ग्रामसभा झाल्या आहेत.

*विकसित भारत -जी राम जी अधिनियम, २०२५ नागरिकांच्या हक्क व लाभांविषयी माहिती*

*१२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी :*

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नोंदणीकृत कुटुंबास प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या अकुशल रोजगाराची वैधानिक हमी देण्यात येते. रोजगाराची मागणी केल्यानंतर नियमानुसार रोजगार उपलब्ध करून देणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे.

*विलंबित मजुरीबाबत तरतूद :*

विकसित भारत – जी राम जी अधिनियम, २०२५ अंतर्गत केलेल्या कामाची मजुरी निश्चित कालावधीत अदा करणे बंधनकारक आहे. मजुरी अदा करण्यात विलंब झाल्यास पात्र मजुरांना नियमानुसार ‘विलंब भरपाई’ देण्याची तरतूद अधिनियमात करण्यात आलेली आहे.

*बेरोजगारी भत्ता :*

रोजगाराची मागणी करूनही विहित कालावधीत रोजगार उपलब्ध न झाल्यास संबंधित पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. यामुळे रोजगाराचा हक्क अधिक प्रभावीपणे संरक्षित केला जातो.

*थेट लाभ हस्तांतरण :*

विकसित भारत – जी राम जी अधिनियम, २०२५ अंतर्गत मजुरांची मजुरी व इतर देयके थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा केली जातात. यामुळे व्यवहारात पारदर्शकता व वेळेवर देयक वितरण सुनिश्चित होते.

*पंचायतराज संस्थांची भूमिका :*

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या पंचायतराज संस्थांची मनरेगा अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ग्रामसभा स्तरावर कामांचे नियोजन, कामांची निवड, अंमलबजावणी, देखरेख व सामाजिक लेखापरीक्षणाद्वारे स्थानिक सहभाग सुनिश्चित केला जातो.

ग्रामपंचायत ग्रामीण रोजगार हमी कार्ड जारी करणे, विकसित ग्रामपंचायत आराखडे तयार करणे व अधिनियमातील इतर कार्यांसाठी जबाबदार असेल. पंचायती राज संस्थांची भूमिका ग्रामपंचायत ही प्राथमिक अंमलबजावणी संस्था असेल. कामगार नोंदणी, ग्रामीण रोजगार हमी कार्ड जारी करणे आणि प्राधान्यक्रमानुसार किमान 50 टक्के कामांची अंमलबजावणी करणे. ग्रामसभा नियमित सामाजिक लेखापरीक्षण करेल. पंचायत समिती स्तरावर नियोजन, प्रस्तावांचे संकलन व अभिसरण सुलभ केले जाईल. जिल्हा परिषद समर्पित संचालन समितीद्वारे एकूण देखरेख-निरीक्षण करतील व एकत्रित जिल्हा आराखडे तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) सहाय्य करतील.

*नवीन अधिनियमांतर्गत निर्माण होणाऱ्या ग्रामीण मालमत्तांची उदाहरणे :*

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ अंतर्गत चार वर्गवारी मध्ये कामांचा समावेश करण्यात आलेला असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :* (वर्ग अ) जलसुरक्षेसाठी पाण्याशी संबंधित कामे – १०७ कामे, (वर्ग ब) मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा- ९० कामे, (वर्ग क) उपजीविका व रोजगारवाढीसाठी संबंधित पायाभूत सुविधा -८६ कामे आणि (वर्ग ड) अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर इत्यादी तीव्र हवामान घटनांच्या परिणामांचे शमन करण्यासाठीची कामे – ३५ कामे असे असे एकूण ३१८ कामांचा समावेश करण्यात आला आहे.

*हंगामात शेतमजुरांची उपलब्धताबाबत :*

ग्रामीण कामगारांसाठी वाढीव मजुरी-रोजगार हमीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः पेरणी व कापणीच्या पीक हंगामात शेतमजुरांची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. राज्यांना एका आर्थिक वर्षात एकूण साठ (६०) दिवसांचा कालावधी आगाऊ अधिसूचित करण्याचा अधिकार देण्यात येईल. या कालावधीत या अधिनियमांतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार नाही.

*निधीवाटप पद्धत :*

केंद्र सरकार व राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांमधील निधीवाटप पद्धत ईशान्य व हिमालयीन राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी ९०:१० आणि इतर सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसाठी ६०:४० अशी असेल. केंद्र सरकार वस्तुनिष्ठ निकषांचा समावेश असलेल्या संयुक्त निर्देशांकाच्या आधारे प्रत्येक राज्याला मानकाधारित निधीवाटप करेल. मान्य मानक वाटपापेक्षा जास्त झालेला खर्च संबंधित राज्य सरकारची जबाबदारी असेल.

*अंमलबजावणी संरचना व जिल्हा कार्यक्रम समन्वयक :*

राष्ट्रीय स्तरावरील संचालन समिती योजनेवर एकूण देखरेख करेल व मानक वाटप मंजूर करण्यासह अधिनियमांतर्गत विहित इतर कार्यासाठी जबाबदार असेल. राज्य संचालन समिती राज्यातील अंमलबजावणीवर देखरेख, पर्यवेक्षण व धोरणात्मक मार्गदर्शन देईल, राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा स्तरावर योजनेअंतर्गत सर्व उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी, निरीक्षण व समन्वय करण्याची जबाबदारी जिल्हा कार्यक्रम समन्वयकांची (जिल्हाधिकारी) असेल. तालुका स्तरावरील कार्यक्रम अधिकारी रोजगार मागणी प्रक्रिया व व्यवस्थापन, कामस्थळांचे व्यवस्थापन-पर्यवेक्षण आणि सहभागी नियोजन प्रक्रियांना सहाय्य करेल.

*मजुरी दर :*

मजुरी दर अकुशल शारीरिक कामांसाठी मजुरी दर केंद्र सरकारकडून निश्चित केले जातील. स्वतंत्र दर अधिसूचित होईपर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) अंतर्गत अधिसूचित दर लागू राहतील.

*पारदर्शकता व जबाबदारी :*

बायोमेट्रिक प्रमाणीकरण, अवकाशीय तंत्रज्ञानाधारित नियोजन, मोबाईल व डॅशबोर्ड-आधारित संनियंत्रण, साप्ताहिक सार्वजनिक प्रकटीकरण प्रणाली‌द्वारे पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित केली जाईल. सामाजिक लेखापरीक्षण यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. सध्या मनरेगा अंतर्गत सुरु असलेली कामे बंद न होता चालू राहतील व पूर्ण केली जातील. नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर त्या कायद्यानुसार नवीन कामे हाती घेण्यात येतील असेही श्री. डुडी यांनी कळविले आहे.

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️*जबिलच्या रांजणगाव येथील अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन; इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर*

पुणे, दि. १७ : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्ञानेश्वर कटके, राज्याचे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे उद्योग क्षेत्राला नवी गती मिळणार आहे.
यावेळी त्यांनी जेएनपीटी आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्याची माहिती दिली. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार असून त्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून निर्यातीत हा वाटा २० टक्क्यांपर्यंत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जबिलच्या या अत्याधुनिक प्रकल्पात दिसणारी अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत असून मोबाईल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

राज्यातील उद्योगांना शासन भागीदार म्हणून पाहत असून व्यवसाय सुलभतेसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. रांजणगाव परिसरात महावितरण (एमएसईडीसीएल) चे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्यबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेली कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत या औद्योगिक पट्ट्यात पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या जमीन सुधारणांमुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे उद्योगांना मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प सुरू असून मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे २ तास ८ मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगून देशात मोठे औद्योगिक आणि पायाभूत परिवर्तन घडत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या एका वर्षात जबिल कंपनीचे भारतातील एकूण उत्पादन क्षेत्रफळ ५ लाख चौरस फुटांवरून १२ लाख चौरस फुटांपर्यंत वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांवरून जवळपास ११ हजारांपर्यंत पोहोचली आहे असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला म्हणाले.

जबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. हा नवीन प्रकल्प कुशल मनुष्यबळ आणि अभियांत्रिकी क्षमता एकत्र आणून उच्च दर्जाची उत्पादने अधिक वेगाने तयार करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

संपादकीय :-

स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली हुलावळे, सुनीता येवले, शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, गणेश खांडगे, साहेबराव कारके यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी मिळणे आवश्यक आहे. यासाठी डिजिटल क्लासरूम, आधुनिक शैक्षणिक साधने आणि गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि कौशल्यविकासालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रातही प्रगती साधून मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांचे रूपांतर आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण संस्थांमध्ये करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे. चाचणी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून ‘नासा’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना देण्यात येणाऱ्या टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात चार केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत आणि गुलाबजाम भरवत उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, शाळेविषयी आपुलकी वाढविणे आणि आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणे हा शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश असून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!